Saturday, November 19, 2011

सावरकर आणि क्रांती 


देशावर उत्कट प्रेम, इंग्रजांविषयी चीड आणि बलिदानाची तयारी ह्या तीन गोष्टींपलीकडे बघण्याची आवश्यकता होती. संह्याद्रीच्या कुशीतील चार-दोन किल्ले जिंकून स्वातंत्र्याची ज्योत फुंकणे ह्यात व्यवहार्यता होती पण ती मोगलांविरुद्ध! हाच मार्ग इंग्रजांच्या विरोधात केवळ अव्यवहार्यचं नाही तर भाबडेपणाचा होता. लांब पल्ल्याच्या तोफा, संपर्काची अत्याधुनिक साधने आणि सैन्य-रचनेची भौगोलिक पद्धत ह्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय इंग्रजांना पळवून लावणे शक्य नव्हते. त्यामुळेच वासुदेव बळवंत फडक्यांचा बंड एका जिल्ह्यापुरताच राहिला आणि तो तिथेच मोडला गेला. रेंड ला गोळी घालून किंवा गव्हर्नर वर बॉम्ब फेकून केवळ चीड व्यक्त करता येते, पण इंग्रजी राज्य समाप्त करता येणार नव्हते ही कठोर वास्तव होते. सावरकरांचे वैशिष्ट्य येथे आहे. हे वास्तव जसे जसे त्यांच्या लक्षात गेले, तसे तसे ते अधिक प्रगल्भ होत गेले. सावरकर स्वातंत्र्य ज्योतीने प्रज्वलित होऊन स्वतःच एक मशाल झाले, पण बुद्धीने पाश्चात्य विद्येचे व इंग्रजी राज्याचे वास्तववादी अभ्यास करून एक महान क्रांतीचे योजकही झाले होते. येथे सावरकरांचे वेगळेपण आहे. 

'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का?' ह्या प्रश्नावर अनेक मत प्रवाह असतील, कदाचित 'नाहीच' हा गट अधिक बलवान असेल. पण त्यामुळे क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भ पणे रचली होती हे इतिहासाला दुर्लक्षित करून चालणार नाही. भारतात सशत्र क्रांती करावयाची असेल तर ते काम एका व्यक्तीचे किंवा व्यक्तीसमूहाचे नसून अखिल भारतव्यापी संघटनेचे आहे, ही गोष्ट सावरकरांनी प्रथम ओळखली. त्यासाठी 'अभिनव भारत' संघटना उभारली. संघटनेच्या शाखा केवळ भारतातच नाही तर ब्रिटन, जर्मनी, फ्रांस या राष्ट्रांमध्ये स्थापन केल्या. त्यातून आकारल्या गेली क्रांतीची एक प्रगल्भ योजना. त्यांच्या योजनेचे स्वरूप असे होते - 
सर्व भारताच्या ३०० वर जिल्ह्यात एकाच दिवशी, एकाच वेळी रेल्वेपूल उध्वस्त करणे, विजेच्या तारा तोडणे, मोटारपूल उध्वस्त करणे, बातम्या मिळवणे व सेना संचलन अशक्य करणे, देशात सर्वत्र छोटी शस्त्रागारे लुटणे. यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हवी व ती विदेशी राष्ट्रांकडून मिळवणे आवश्यक आहे, हे सावरकरांनी ओळखले होते. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो, ह्या नात्याने त्यांनी रशियाचा साम्राज्यवादी झार आणि प्रशियाचा हुकुमशहा कैसर यांच्याशी संधान बांधले होते. भारतात क्रांतीची उठावणी होताच क्रांतिकारक सरकारला 'भारत सरकार' म्हणून जर्मनी व रशिया मान्यता देतील ह्याची हमी सावरकरांनी मिळवली होती. क्रांतीच्या ठरलेल्या दिवशी मित्र राष्ट्रांकडून शस्त्रास्त्रांनी भरलेले जहाज भारतात येऊन पोहचतील, अशी आश्वासने इंग्लंडमधील विविध राष्ट्रांच्या वकीलातींकडून त्यांनी मिळवून ठेवली होती. भारत क्रांतीचा स्पोट होताच भारतीय क्रांतिकारकांचा ध्येय-धोरणविषयक जाहिरनामा जगातील सर्व प्रमुख राष्ट्रांत प्रकाशित होईल, ह्याची सोय त्यांनी करून ठेवली होती. आणि एवढी प्रदीर्घ योजनासुद्धा विफल होईल हे आधीच हेरून परागंदा क्रांतीकारकांना जपान, जर्मनी, मेक्सिको, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, रशिया व अमेरिका येथे आश्रय मिळेल ह्याची हमी सावरकरांनी घेतली होती.

विमाने, रडार अजूनही उपलब्ध न झालेल्या जगांत भारताच्या पंचविशीतल्या या पोराने अखिल भारतीय पातळीवर आंतरराष्ट्रीय संबंध लक्षात घेऊन एवढी भव्य कल्पना आखावी ही कल्पनाची किती रोमांचक आहे. म्हणूनच कदाचित पुनर्जन्म ना मानणाऱ्या ब्रिटीश शासनाने त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली असावी!!

संदर्भ -
१. समग्र सावरकर 
२. नरहर कुरुंदकर 
३. इतर वाचन 


अभिषेक म. चौधरी 

9 comments:

Raj Dubal said...

Good one man

शैलेश राजपूत said...

लेख चांगला आहे. सावरकरांच्या इतरही कार्याचा आढावा घ्यावा.

Abhishek Chaudhari said...

धन्यवाद राजजी आणि शैलेशजी...
सावरकरांच्या कार्याचा आढावा! हे १००० अभिषेक चोधाऱ्याच्या १००० पिढ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे..

विवेक कुलकर्णी said...

छान अभिषेक !!!
थोडक्यात एक वेगळा महत्वाचा पैलू लक्षात आणून दिलास. लिहिता राहा . शुभेच्छा !!!
विवेक

Abhishek Chaudhari said...

धन्यवाद सर...
असंख्य पैलू आहेत, एखादा जरी झेपला तरी मिळवले...

Govind V. Kabade said...

Very Good read, liked it.

वंदे मातरम

suruwat said...

Liked it but still i think there must be some edge missing which will talk about why things didnt go as planned?

kaushalkavekar said...

:) indeed good stuff to read..simple n apt .. i would call it a glimpse of his visionary work.

liberty equality fraternity said...

अभिषेक९, तुम्ही हा लेख maybolivar राहू द्या. येथे आलेल्या प्रतिक्रियांना उत्तरे देण्याआधी तुम्ही विशाल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखाला आलेल्या ७०० प्रतिक्रीया नजरेखालून घाला. ज्यांनी सावरकरांच्या विचारांचा आणि चरित्राचा कांहीही अभ्यास केलेला नाही पण ज्यांचा 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे करण्यात हातखंडा आहे आणि ज्यांना 'द्वेषा'ची कावीळ झालेली आहे असे खूप प्रतिसाद तेथे दिसतील. अशांना उत्तरे देण्यात शक्ति खर्च करू नका. त्यांना समजून घ्यायचेच नाही. कांही झाले तरी त्यांची दखलच घेऊ नका. पण सर्वांनी सर्व कांही वाचलेले नसते. त्यांच्यापर्यंत खरी माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न जरूर करा. सावरकर म्हणजे दुर्दम्य आशावाद! कि जो आशावाद 'प्रतिकूल तेच घडण्याची' शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी तयारी ठेवतो ! तुम्हीही असाच आशावाद बाळगावा. येथे तुम्हाला अक्षय जोग किंवा मास्तुरे यांच्यासारखे अभ्यासू लोकही भेटतील. सावरकरांबाबत अभ्यासपूर्वक आक्षेपही येऊ शकतात. असे आहे की जगात होऊन गेलेल्या सर्व थोर व्यक्ति कोठे ना कोठे कमी पडल्याच होत्या! पण कोठली तरी किरकोळ बाब समोर आणून तेच जणू मोठे पाप होते असे दाखविणार्‍या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. याबाबतीत शेषराव मोरे यांची दोन पुस्तके वाचली नसतील तर जरूर वाचा. तसेच प्रा. सदानंद मोरे यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या पुस्तकातही सावरकरांबद्दल बरेच लिहिले आहे तेही वाचा. सर्वच अनुकूल आहे असे नसले तरी त्यात 'कावीळ' नाही. अभ्यासाचा प्रामाणिक प्रयत्न जेथे दिसेल तेथेच प्रतिसाद द्या. इतरांच्या आक्षेपांवर उत्तरे देण्यात कांहीही अर्थ नाही.