Tuesday, November 29, 2011

सावरकर आणि क्रांती - काही उत्तरे

सावरकर आणि क्रांती (वाचण्यासाठी येथे टिचकी मारा) ह्या आधीच्या  लेखावर काही प्रश्न उपस्थित झाली होती, त्यांचे निरसन करण्याचे हा प्रयत्न...

प्रश्न -
१. सशस्त्र क्रांतीच का?
२. सशस्त्र क्रांतीची रूपरेषा - म्हणजे दळवळण साधने तोडणे / रस्ते-पूल उद्ध्वस्त करणे वगैरे वगैरे?
३. अशी क्रांती का झाली नाही ?


१.
सशस्त्र क्रांतीच का? सावरकरांच्या शब्दात - "मानवता ही श्रेष्ठतर देशभक्ती असल्यामुळे जेव्हा मनुष्यजातीचा एक भाग स्वत:चे महत्व अवास्तवपणे वाढवीत आहे व एकंदर मानवाच्या जीवनासच वाढत जाणार्‍या विषारी कर्करोगाप्रमाणे धोका देत आहे असे पाहून आम्ही अस्वस्थ झालो तेव्हा इतर परिणामकारक उपाय नसल्यामुळे आम्हांला शस्त्रवैद्याचा चाकू हातात घेणे भाग पडले. हा उपाय तीव्र वाटला तरी शेवटी दयाळू होता. शक्तीचा प्रतिकार शक्तीने करीत असताना आम्ही हिंसेचा मनापासून तिरस्कार केला व आजही करतो. - (१९२० ले.अं., स.सा.वा. ५: ४९०)."
कुठल्याही प्रकारचा बदल घडवतांना म्हणजेच क्रांती करतांना शास्त्र आणि शस्त्र याचा आधार घेतलाच जातो. १९४२ साली गांधीनीही 'करो या मरो' चा नारा दिलाच की! आणि पुढील शक्ती जर निर्ढावलेली असेल, चिरडून टाकायची भाषा करीत असेल तर उद्वेग होणारच! अगदी आत्ता-आताचे उदाहरण द्यायचे झाले तर - शरद पवारांवर हल्ला! ह्यातील वैयक्तिक राग सोडला तर दरवाढ - भ्रष्टाचार - आणि सरकारची मुजोरगिरी ह्यावरच एका युवकाने केलेला उद्वेग होता. (मी ह्या हल्ल्याचा पूर्ण पणे निषेध करतो. फक्त उदाहरण आणि विवेचानार्थ आधार घेतला आहे.)


२.
क्रांती-योजना - क्रांती-उत्क्रांती ह्या निरंतर प्रक्रिया आहे. प्रत्येक प्रक्रिया हा एक प्रयोगाच म्हणावा लागेल. त्यामुळे फ्रेंच किंवा रशिअन क्रांतीच्या पद्धती भारतीय क्रांतीला लागू पडणे शक्य नव्हते. त्या क्रांती त्याच देशातील जुलमी राजवटी विरुद्ध होत्या. भारतीय क्रांती ही बाहेरून आलेल्या इंग्रंज राजवटीच्या च्या विरोधात अखावयाची होती. पण मुळातच सशस्त्र क्रांतीचे काही नियम आहेत.
अ] 'एकच दिवशी, एकच वेळी' ह्याचा अर्थ सशस्त्र उठवत 'surprise element ' अत्यावश्यक! सावरकरांच्या शब्दात सांगायचे तर - "मंदपणासारखे क्रांतीला प्राणहरण करणारे दुसरे विष नाही. क्रांतीचा विस्तार जितका त्वरित व जितका आकस्मिक होईल तितका तिच्या जयाचा संभव जास्त वाटत असतो. ही विस्ताराची त्वरा शिथिल झाली म्हणजे शत्रूला संरक्षणाची संधी मिळते. जे आधी उठतात त्यांचा आपल्याबरोबर कोणी येत नाही म्हणून उत्साह घटू लागतो व जे मागून येणार त्यांच्या मार्गात मधल्या संधीचा फायदा घेणारा चाणाक्ष शत्रू अनेक विघ्ने रचून ठेवतो. म्हणून उठावणी व प्रसार यांच्यामध्ये फार वेळ जाऊ देणे हे क्रांतियुध्दला सदोदित अपायकारक होते. - (१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ : १०७)."
ब] दुसरा नियम म्हणजे संपर्क आणि दळणवळण प्रणाली. एका लेखकाने (माझ्या आठवणी प्रमाणे इब्लीस) १८५७ च्या उठाव फसल्याचे कारण 'communication gap ' हे योग्य प्रकारे दिले. संपर्क व दळणवळण ह्या दुधारी तलवारी आहेत. युद्धात ज्याच्याकडे याचे नियंत्रण राहिले त्याचा विजय निश्चित. हे सावरकरांनी ही ताडले. टपाल आणि रेल्वे हे ब्रिटीश शासनाचे भारतातील सत्ता राखण्याचे महत्त्वाचे काम करीत होत्या. ह्याच २ महत्त्वाच्या स्थानावर सावरकर कब्जा करू पाहत होते. आता काबीज कसे करायचे आणि नाही झाले तर काय? ह्यावर माझ्या वाचण्यात नेमका आराखडा आला नाही. "सर्व भारताच्या ३०० वर जिल्ह्यात एकाच दिवशी, एकाच वेळी रेल्वेपूल उध्वस्त करणे, विजेच्या तारा तोडणे, मोटारपूल उध्वस्त करणे", एवढेच माझ्या वाचण्यात आले. पण ह्यावरून हे स्पष्ट आहे की, ब्रिटीश सैन्याची हालचाल त्यांना पूर्ण पण थांबवणे अपेक्षित होते. सर्वच ३०० जिल्हांमध्ये एकच वेळी जर सर्व मोक्याची ठिकाणे क्रांतिकारकांनी हातात घेतली आणि ब्रिटीश सैन्य संचालन अशक्य केले, तर क्रांती मोडून काढणे ब्रिटिशांना केवळ अशक्य होते.
क] तिसरा नियम म्हणजे क्रांती काळातील अराजकता आणि त्यावर उपाययोजना. यावर सावरकर म्हणतात - "ज्याचे राज्य उलथून टाकावयाचे असेल त्याच्या कायद्यांना तरवारीने चिरुन टाकणे म्हणजे राज्यक्रांती होय ! परंतु एकदा परक्यांच्या कायद्याला तरवारीने चिरण्याची सवय लागली की मग त्या धुंदीमध्ये त्या सवयीचे पर्यवसान वाटेल त्या कायद्याला स्वत:च्या लहरीप्रमाणे तुडविण्याची खोड लागू शकते. दुष्ट कायद्याचा नाश करण्याचे कामी चटावलेली तरवार कायद्याचाच नाश करु शकते. परक्यांच्या अंमलाचा नि:पात करु निघालेले वीर शेवटी अंमलाचाच नि:पात करु लागतात ... अराजकता ही परराज्याइतकीच व बंधनरहितता दुष्ट बंधनाइतकीच व्यक्तीच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या नाशाला कारणीभूत होणारी आहे. ह्या समाजसत्याचे विस्मरण ज्या ज्या क्रांतीत घडू लागले त्या त्या क्रांतीचा तिच्या क्रांतित्वामुळेच विनाश झालेला आहे. -(१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ :२८६,२८७)." ह्यावर अधिक काही लिहिण्याची आवश्यकता नसावी.
ड] चौथा नियम म्हणजे क्रांतीला मान्यता. ह्यावर आधीच्याच लेखात काही उल्लेख आहेतच. एकदा राष्ट्र स्वतंत्र झाले की, त्यास आंतर-राष्ट्रीय मान्यता मिळवणे हे प्रथम कार्य. त्याला अनुसरूनच सावरकरांनी ही तरतूद करून घेतली होती. (पण अशी कुठलेच हमीपत्र अजून तरी माझ्या वाचण्यात आलेली नाहीत, येथे त्यांचा उल्लेख सावरकरांवर इतरांनी (कुरुंदकर इ प्रभूती) केलेल्या लिखाणास आधार घेऊन केला आहे.) अशीच आश्वासने सुभाषचंद्र बोसांनी जपान, जर्मनी व इटली कडून मिळवली होती, हे सर्वश्रुत आहे.


३. अशी क्रांती का झाली नाही?
ह्या सर्वांगीण क्रांतीची कल्पना सावरकरांना कधी सुचली, त्यांनी त्यावर काम करण्यास कधी चालू केले याचा काही ठोस पुरावा माझ्या वाचनात नाही. 'अभिनव भारत' संघटनेची स्थापना १९०४ साली झाली. कदाचित त्यानंतरच ह्या योजना अकार घेत असाव्यात. पुढील काही वर्षातच अभिनव भारत फोफावली. तिचे बंगाल आणि पंजाब येथील संघटनेशी संधान बांधल्या गेले. पुढे सावरकर लंडनला गेल्या नंतर लंडनमध्ये 'इंडिया हाउस' मधून कार्य चालू केले. सेनापती बापट, अय्यर, धिंग्रा, मादाम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा, लाल हरदयाळ हे वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना जोडले गेले. ह्या सगळ्या संघातानातून युरोप मध्ये भारतीय क्रांती चळवळ फोफावली. स्टूटगार्ड येथे फडकलेला भारतीय ध्वज, कर्झन वायलीचा वध, सावरकरांना नाकारण्यात आलेली वकिलीची सनद, बॉम्ब बनविण्याची कला हस्तगत करणे, पिस्तुल व बॉम्ब भारतात पाठवणे अशी अनेक युरोपात होत होती. पण वायलीचा व भारतात जक्सन चा वध या घटनानंतर ब्रिटिशांनी पाळेमुळे खाण्याला चालू झाली. धरपाकडी झाल्या, काही भूमिगत झाले, काहींनी मार्ग बदलेल. क्रांतीचे प्रणेते सावरकर ह्यांना काळेपाणी झाले, आणि सगळे अर्धवट राहिले. सावरकर सुटले तेंव्हा परिस्थिती बदलेली होती.
ह्याचे राजकीय विवेचन कुरुंदकर फार छान करतात - "ज्या तरुणांना सावरकर पाचू शकले असते ते तरुण सावरकर बंधनमुक्त होण्यापूर्वी गांधीजींच्या नेतृत्वाखाली येऊन गेले होते. आणि सावरकर ज्यांना पचणेच शक्य नव्हते त्या भीरु, अंधश्रद्धा, सनातनी, वयस्क मंडळीच्या कोंडाळ्यात सावरकरांना राहणे भाग पडले ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे."

No comments: